आभासी चलनात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सव्वाचार कोटींची फसवणूक; फरार आरोपी कोल्हापुरातून जेरबंद


आभासी चलनात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सव्वाचार कोटींची फसवणूक; फरार आरोपी कोल्हापुरातून जेरबंद

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

जालना प्रतिनिधी : आभासी चलनाच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली. अमोद वसंत म्हेतर (वय ५०, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभासी चलन BLSS व VDTT यामध्ये मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून घेत आरोपी पसार झाले.

या प्रकरणी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त तक्रारीवरून अमोद वसंत म्हेतर याच्यासह इरफान सय्यद मोय्योद्दीन, व्यंकटेश दशरथ भोई, रमेश उत्तेकर, अजय गायकवाड आणि शव्वरी अमोद म्हेतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तसेच त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवारातील व्यक्तींकडून एकूण ४ कोटी ३० लाख ६६ हजार ७९५ रुपयांची गुंतवणूक करून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४१/२०२५ नुसार भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, १२०(ब) तसेच MPID कायद्याच्या कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींविरुद्ध यापूर्वीही तालुका जालना पोलीस ठाण्यात GDCC (क्रिप्टोकरन्सी) संदर्भात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक मिहुन घुगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी अमोद म्हेतर याचा शोध घेतला. वरिष्ठांची परवानगी घेऊन पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आणि वडगाव पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने २० ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने तळसुंदे गावात आपली ओळख लपवून वास्तव्य केले होते. परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी भाड्याने खोल्या घेऊन राहत असल्याचा फायदा घेत आरोपीने तेथे खोली भाड्याने घेतली होती. त्याने दाढी वाढवून स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला अटक केली.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या काळात आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम तसेच या प्रकरणातील इतर आरोपींच्या सहभागाबाबत तपास केला जाण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिहुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेष म्हस्के तसेच पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, किरण चव्हाण, समाधान तेलंग्रे ,विष्णू कोरडे, ज्ञानोबा खुणे आणि श्रेयश वाघमारे यांच्या पथकाने केली.

फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार द्यावी

क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलनाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी महेंद्र बेराड


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!