भुलेश्वरमध्ये गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना; मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी


भुलेश्वरमध्ये गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना; मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

मुंबई : दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल २२ फूट उंच गणेशमूर्तीचा आगमन सोहळा सुरू असताना अचानक मूर्ती पुढील बाजूस कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते संकेत नेवशे (वय ३३) आणि पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लहान मुलींसह पाच जण जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास जय आंबे चौक, कबुतरखान्याजवळील बलराम मर्चंट रोड येथे घडली. गणेशमूर्तीच्या आगमनाची मिरवणूक सुरू असताना मूर्तीच्या मागील बाजूस असलेला स्टील फ्रेमचा वेल्डिंग सपोर्ट तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर भव्य मूर्ती अचानक पुढील बाजूला कोसळली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
मूर्ती कोसळताच उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जी. टी. रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाल्याने गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गणपती आगमनाचा उत्साह काही क्षणांतच दुःखात बदलला.
दरम्यान, व्ही. पी. रोड / डी. बी. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून दुर्घटनेमागील नेमके कारण, मूर्ती उभारणीतील सुरक्षा व्यवस्था आणि स्टील फ्रेमच्या वेल्डिंगची स्थिती याबाबत पुढील तपास सुरू आहे. दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कोणत्याही निष्काळजीपणाचा तपास करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!