निकृष्ट पोषण आहाराचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन रद्द
पुणे : आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका देवयानी उर्फ रेश्मा पारधी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी त्यांच्यावरील सेवामुक्तीचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा अंगणवाडी सेविका पदावर रुजू करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील पांढरा वाटाणा आणि भरडा व्यवस्थित शिजलेला नसल्याचा दावा करत पारधी यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संबंधित पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
पारधी यांनी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून शिस्तभंगाचे कारण देत त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईनंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तसेच अंगणवाडी सेविका संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या सेविकेवरच कारवाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला. कारवाई मागे घेण्याची मागणीही विविध स्तरांतून करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने सेवामुक्तीचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवयानी उर्फ रेश्मा पारधी यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, भविष्यात अशा तक्रारींकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





