नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच पराक्रम


नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच पराक्रम

परभणी : राज्यभरात विविध स्पर्धा आणि व्यावसायिक परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना समोर येत असतानाच आता नर्सिंग परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या गैरप्रकाराचा गंभीर प्रकार परभणीत उघडकीस आला आहे. परभणीतील एका परीक्षा केंद्रावर कार्यरत असलेल्या परीक्षा पर्यवेक्षिकेने आपल्या बहिणीला परीक्षेत मदत करण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते व्हॉट्सॲपवर पाठवल्याचा आरोप समोर आला आहे.
परीक्षा केंद्रातील नियम धाब्यावर
परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास मनाई असतानाही संबंधित पर्यवेक्षिकेने मोबाईलचा वापर केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा यंत्रणेत खळबळ उडाली.
नानलपेठ पोलिसांकडून कारवाई
या प्रकरणी परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
नीट आणि टीईटी परीक्षांशी संबंधित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर आता नर्सिंग परीक्षेतील हा प्रकारही गंभीर मानला जात आहे. परीक्षा केंद्रावर जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच प्रश्नपत्रिका बाहेर पाठवली गेल्याचा आरोप असल्याने परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षा आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, प्रश्नपत्रिका नेमकी किती जणांपर्यंत पोहोचली आणि या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाला का, याचा तपास नानलपेठ पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!