लातूरमध्ये २,१३४ कोटींचा महाघोटाळा; १६ कंपन्यांसह एकावर गुन्हा
विशेष प्रतिनिधी | लातूर
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून परदेशी निधी पाठवल्याच्या आरोपातून तब्बल २,१३४ कोटी ७९ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आयकर विभागाच्या तपासातून हा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त संचालक दीपक कुमार यांच्या तक्रारीवरून उदगीर पोलीस ठाण्यात श्याम शिवप्रसाद कलानी आणि १६ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे परदेशी निधी पाठवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लातूर आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात नेमका किती निधी कोणत्या माध्यमातून पाठवण्यात आला, तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





