भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य; प्लॉट नं. ५० परिसरात दुर्गंधी, आरोग्य धोक्यात
भोसरी (विशेष प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरातील सेक्टर १०, प्लॉट क्रमांक ५० च्या आसपास उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिक आणि कामगार त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला तसेच भिंतीलगत प्लास्टिक, सुका कचरा आणि विविध टाकाऊ वस्तूंचे ढीग साचले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसी परिसरात विविध उद्योगांमध्ये काम करणारे कामगार तसेच या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून साचलेला कचरा हटवावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
एमआयडीसी प्रशासन तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित कचरा संकलन आणि स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. केवळ कचरा हटवून न थांबता पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने या समस्येवर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







