रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारासाठी आवश्यक जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक वर्षाची मुदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी या निर्णयाची घोषणा केली. या एक वर्षाच्या कालावधीत मराठी न येण्याच्या कारणावरून चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. विविध वयोगटातील चालकांना कमी कालावधीत भाषा शिकणे कठीण असल्याचे संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सरकारने एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला.
क्लासेस आणि मराठी साहित्याच्या माध्यमातून प्रशिक्षण
या मुदतीचा उपयोग करून चालकांनी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेली जुजबी मराठी आत्मसात करावी, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित चालक संघटनांकडून क्लासेस तसेच मराठी साहित्याच्या माध्यमातून चालकांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
वर्षभर कारवाईला स्थगिती
मराठी भाषेच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी चालकांना मुदत देण्यात आली होती. मात्र, चालक संघटनांनी आणखी वेळ मागितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली. या कालावधीत मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्यामुळे रिक्षा किंवा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील एक वर्षात त्यांनी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक मराठी भाषा शिकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




