बीसीसीआयकडून अंडर-१९ संघाची घोषणा; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी


बीसीसीआयकडून अंडर-१९ संघाची घोषणा; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पुणे : ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाच्या भारत दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा संघ भारत दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामने खेळणार आहे. BCCIने २७ ऑगस्ट रोजी दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र भारतीय संघ जाहीर केले.
आर्यवीर सेहवाग, अन्वय द्रविड यांना वन-डे संघात स्थान
भारताचे माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड यांना भारताच्या अंडर-१९ वन-डे संघात स्थान मिळाले आहे. अन्वय द्रविड यष्टीरक्षक-फलंदाज आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत खेळताना दिसू शकतात.
१८ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात
भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघांमधील पहिला वन-डे सामना १८ सप्टेंबर २०२६ रोजी राजकोटमध्ये होणार आहे. त्यानंतर २१ आणि २३ सप्टेंबर रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वन-डे सामना राजकोटमध्येच खेळवला जाणार आहे.
यानंतर २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान पहिला बहुदिवसीय सामना राजकोट येथे, तर ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबाद येथे होणार आहे.
दिग्गजांचा वारसा पुढे नेण्याची संधी
सेहवाग आणि द्रविड यांच्या मुलांची एकाच भारतीय अंडर-१९ वन-डे संघात निवड झाल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या दोन्ही युवा खेळाडूंकडे लागले आहे. मात्र, अंतिम संघातील निवड ही त्यांच्या कामगिरीच्या आधारे झालेली असून, मैदानावरील कामगिरीतून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आव्हान आता आर्यवीर आणि अन्वय यांच्यासमोर आहे.


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!