एकाच डक्टमध्ये वर्षभरात ५ बळी! निगडीत दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; सुरक्षेवर गंभीर प्रश्न
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पिंपरी-चिंचवड : निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ असलेल्या बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये अडकून दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज बाबुराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय १९/२०) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
२६ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११.४५ वाजता दोघे डक्टमध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोन्ही कामगारांना डक्टमधून बाहेर काढून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नेमका मृत्यू कशामुळे? तपास सुरू
डक्टमध्ये ऑक्सिजनचा अभाव किंवा विषारी वायूमुळे गुदमरल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच दोघे डक्टमध्ये नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणते काम करण्यासाठी उतरले होते, याचा निगडी पोलीस तपास करीत आहेत. बीएसएनएलचे कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वर्षभरात याच डक्टमध्ये पाच मृत्यू
धक्कादायक बाब म्हणजे, १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच डक्टमध्ये तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी दोन कामगारांचा बळी गेल्याने वर्षभरात मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. यामुळे भूमिगत डक्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा आणि संबंधित प्रशासनाच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
एकाच ठिकाणी वर्षभराच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच कामगारांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. मागील दुर्घटनेनंतरही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, कामगारांना सुरक्षा साधने देण्यात आली होती का आणि त्यांना डक्टमध्ये उतरण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी तूर्तास तपास सुरू केला असून, निष्काळजीपणा किंवा इतर कारणे आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एकाच डक्टमध्ये वर्षभरात पाच बळी गेल्याने आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





