पुण्यात मुलाकडून आईची गळा चिरून हत्या; विश्रांतवाडीत खळबळ
पुणे : विश्रांतवाडी परिसरातील शांतिनगर झोपडपट्टीत शनिवारी रात्री धक्कादायक हत्या घडल्याने परिसरात खळबळ उडाली. अनिकेत सुरेश हरिभक्त (३०) याने क्षुल्लक वादातून आई सविता सुरेश हरिभक्त (४८) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा गळा चिरल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. सविता यांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. गंभीर जखमी अवस्थेत सविता यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा अनिकेत हरिभक्त याला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असले तरी हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे विश्रांतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




