अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. शरीरातील संसर्ग आणि वाढता अशक्तपणा यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, त्यानुसार पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





