हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके एकत्र; महाराष्ट्र-कर्नाटकात संयुक्त आंदोलनाची तयारी


हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके एकत्र; महाराष्ट्र-कर्नाटकात संयुक्त आंदोलनाची तयारी

बंगळुरू : प्रादेशिक भाषांचे अस्तित्व आणि भाषिक अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिके यांनी एकत्र येत संयुक्त आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. हिंदी भाषेची सक्ती आणि प्रादेशिक भाषांवरील कथित अतिक्रमणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात समन्वयाने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि कन्नड रक्षक वेदिकेचे अध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्यात कर्नाटकात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत प्रादेशिक भाषांचे संरक्षण, स्थानिक भाषांना प्राधान्य आणि हिंदीच्या सक्तीला विरोध या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत देशातील विविध प्रादेशिक भाषांच्या संरक्षणासाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ या संयुक्त व्यासपीठाची स्थापना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून विविध राज्यांतील भाषिक संघटनांना एका व्यासपीठावर आणून भाषिक हक्कांसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये हिंदी भाषेची सक्ती होऊ नये, तसेच स्थानिक भाषांना त्यांच्या राज्यात योग्य स्थान मिळावे, यासाठी भविष्यात संयुक्त पद्धतीने आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या सहकार्यामुळे मराठी आणि कन्नड भाषेच्या प्रश्नावर महाराष्ट्र-कर्नाटकातील भाषिक संघटनांमध्ये समन्वय वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात संयुक्त आंदोलनाची रूपरेषा अधिक स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!