गोरेवाड्याला जागतिक दर्जाचे वन्यजीव पर्यटन केंद्र बनविण्याचा संकल्प; आफ्रिकन सफारीला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर :बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करून त्याला जागतिक दर्जाचे वन्यजीव पर्यटन केंद्र बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गोरेवाडा प्रकल्पातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी आफ्रिकन सफारीसह प्रकल्पातील महत्त्वाच्या कामांना निश्चित कालमर्यादा ठरवून गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गोरेवाडा प्रकल्पाच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आफ्रिकन सफारीच्या कामाची सद्यस्थिती, आवश्यक पायाभूत सुविधा, प्रकल्पाची प्रगती तसेच सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत माहिती घेण्यात आली.
गोरेवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२१ मध्ये पूर्ण झाला असून, त्यामध्ये वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझाचा समावेश आहे. आता प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी प्रस्तावित आहे.
दुसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारीसोबत वॉकिंग ट्रेल, सफारी प्लाझा, ॲनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. आफ्रिकन सफारी हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा आकर्षणबिंदू असल्याने त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे निश्चित करून ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांसारख्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेवाडा केवळ वन्यजीव पाहण्याचे ठिकाण न राहता जैवविविधता, निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे व्यापक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संकल्पना आहे.
ताडोबा आणि पेंचला येणाऱ्या पर्यटकांचा गोरेवाड्यातील मुक्काम वाढविण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ताडोबा, पेंच आणि गोरेवाडा या पर्यटनस्थळांमध्ये प्रभावी पर्यटन सर्किट विकसित करून पर्यटकांना गोरेवाड्यात किमान एक ते दोन दिवस थांबता येईल, अशा सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
गोरेवाड्याच्या दीर्घकालीन विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी. भविष्यातील पर्यटनाची गरज, पर्यटकांची वाढती संख्या आणि अत्याधुनिक सुविधांचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
गोरेवाडा प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करत विविध सुविधांची माहिती घेतली. सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील टप्प्यातील कामांसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश दिले.
यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





