कास पुष्प पठारावर फुलांची रंगत; १ सप्टेंबरपासून पर्यटन हंगामाला सुरुवात
सातारा : निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कास पुष्प पठारावर यंदाचा फुलांचा बहर सुरू झाला असून, १ सप्टेंबरपासून पर्यटन हंगाम अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. UNESCOच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या पठारावर विविध रंगांची फुले उमलू लागल्याने संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने बहरला आहे.
पर्यटकांना फुलांचा मनमोहक नजराणा अनुभवता यावा, तसेच वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन व्यवस्थित करता यावे, यासाठी वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ऑनलाइन प्रवेश बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आगाऊ ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांसोबतच पर्यटकांना कुमुदिनी तलाव आणि मंडपघळ या निसर्गरम्य ठिकाणांचाही आनंद घेता येणार आहे. फुलांच्या बहरामुळे आगामी काळात कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन बुकिंगसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी




