पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी


पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

प्रतिनिधी : अभिजित कुलकर्णी
पुणे : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, तसेच नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण पुणे जिल्ह्यात लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्रखर लेझर किरणांमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रकाश आणि ध्वनीच्या अतिरेकामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान निर्बंध
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. गणेश मंडळे, मिरवणुकीतील आयोजक तसेच लाईट आणि साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य आणि सार्वजनिक शांतता यांना प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!