रील्स बनवण्यासाठी महामार्गावर वाहतूक रोखली; कारमालकासह चौघांवर गुन्हा


रील्स बनवण्यासाठी महामार्गावर वाहतूक रोखली; कारमालकासह चौघांवर गुन्हा
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पुणे : नवीन आलिशान कार खरेदी केल्यानंतर तिचे फोटो आणि रील्स बनवण्यासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवून धोकादायक पद्धतीने चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर ते वाकड दरम्यान महामार्गावर वाहनांचा ताफा थांबवून रील्स तयार केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत बावधन पोलिसांनी कारमालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ केदारी यांनी नवीन आलिशान कार खरेदी केली होती. या कारचे फोटो आणि सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्याच्या उद्देशाने महामार्गावर वाहनांची ये-जा अडविण्यात आली. यावेळी फोटोग्राफर सोहम चव्हाण याच्यासह काही कारचालकांनी रस्त्यावर वाहने थांबवून चित्रीकरण केल्याचे समोर आले.
महामार्गावर अशा प्रकारे वाहने थांबवून चित्रीकरण केल्यामुळे इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला. तसेच अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. या प्रकारामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी झाली.
या प्रकरणी बावधन पोलिसांनी सोमनाथ केदारी, सोहम चव्हाण आणि इतर संबंधित वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि धोकादायक पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियासाठी रील्स किंवा फोटोशूट करताना सार्वजनिक रस्ते आणि महामार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!