दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे; नव्याने FIR दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणाला सहा वर्षांनंतर पुन्हा मोठे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी, २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBIकडे सोपविण्याचे आदेश दिले. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
न्यायालयाने CBIच्या मुंबई विभागाच्या संयुक्त संचालकांना या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्याने सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून त्यांच्या तक्रारीच्या आधारे FIR दाखल करावी आणि त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दिशा सालियान यांचा जून २०२० मध्ये मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीपासूनच विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दिशा यांच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित मुंबई पोलिसांकडील कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे CBIकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासादरम्यान संज्ञेय गुन्हा आढळल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मात्र, केवळ FIR दाखल करण्याच्या आदेशावरून कोणालाही आरोपी किंवा दोषी मानता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तपासातून संबंधित व्यक्तीविरुद्ध पुरेसे पुरावे आणि वाजवी संशय निर्माण झाल्यानंतरच आरोपी म्हणून कारवाई केली जाऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले.
या निर्णयामुळे दिशा सालियान यांच्या मृत्यूची चौकशी आता नव्या दिशेने होणार असून, CBIच्या तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




