पुणे महापालिकेच्या विकासकामांवर टीका करणारे युट्यूबर संतोष पंडित पोलिसांच्या ताब्यात; चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही केली होती टीका, रात्री १ वाजता कारवाई
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे युट्यूबर संतोष पंडित यांना कोथरुड पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले.
संतोष पंडित हे आपल्या YouTube व्हिडिओंद्वारे पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांवर तसेच स्थानिक प्रश्नांवर भाष्य करत असतात. त्यांच्या व्हिडिओंमध्ये सार्वजनिक विकासकामांसोबतच राजकीय नेत्यांवरही टीका केली जात होती. महाराष्ट्राचे मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही संतोष पंडित यांनी उघडपणे टीका केली होती.
दरम्यान, कोथरुड परिसरातील महापालिकेच्या विकासकामांबाबत व्हिडिओ करताना अश्लील शेरेबाजी तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप संतोष पंडित यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली. त्यानंतर बुधवारी रात्री कोथरुड पोलिसांचे पथक दोन पांढऱ्या वाहनांतून नागरी पोशाखात त्यांच्या घरी पोहोचले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संतोष पंडित यांना ताब्यात घेतले.
संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया व्हिडिओंमुळे पुण्यातील विकासकामे, महापालिका प्रशासन आणि स्थानिक राजकारणावरून यापूर्वीही चर्चा रंगली होती. आता पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संतोष पंडित यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांची बाजू तपासानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




