आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट; महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार स्मार्ट
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि नागरिककेंद्री करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, आरोग्य सुविधा केंद्र आणि स्टार रेटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ४० हून अधिक पोर्टलवरील माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार असून, त्यातून राज्य व जिल्हानिहाय आरोग्य व्यवस्थेचे विश्लेषण करता येणार आहे.
एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून १०४ कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारी, आरोग्यविषयक संपर्क आणि अतिजोखमीच्या रुग्णांचा पाठपुरावा केला जाणार आहे.
शासकीय रुग्णालयांच्या सेवा, औषधांचा पुरवठा, कर्मचारी उपस्थिती, स्वच्छता आणि रुग्णांचे अभिप्राय यावर आधारित स्टार रेटिंग दिले जाणार आहे.
दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित **‘महा पल्स एआय’**चा पथदर्शी प्रकल्प कोल्हापूरमध्ये राबविण्यात येणार असून, १०४ आरोग्य संस्था आणि १२ तालुके डिजिटल प्रणालीशी जोडले जाणार आहेत.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




