संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर भाष्य करणारे कंटेंट क्रिएटर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह तसेच अश्लील स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांचे पथक गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता संतोष पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या संबंधित व्हिडिओवरून पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोथरूडमधील विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर व्हिडिओ करताना पंडित यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. मात्र, या टीकेदरम्यान अपशब्द आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.
यापूर्वीही संतोष पंडित यांच्याविरोधात पुण्यात सोशल मीडिया व आंदोलनाशी संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, संतोष पंडित यांच्यावरील आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात नेमकी कोणती कलमे लावण्यात आली आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे




