भारत-युरोप आर्थिक भागीदारीत महाराष्ट्र ठरणार प्रमुख भागीदार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मुंबई-अँटवर्प’ आर्थिक भागीदारीचा प्रस्ताव; बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय संवाद
मुंबई भारत-युरोपियन युनियन (EU) मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक लाभात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत आयोजित ‘भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र आणि बेल्जियममधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मुंबई-अँटवर्प’ आर्थिक भागीदारी विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. हिरे व्यापारासोबतच वित्त, बंदरे, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि बेल्जियमदरम्यान प्रगत उत्पादन व हरित उद्योग, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ ऊर्जा व हरित हायड्रोजन, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान तसेच बंदरे, लॉजिस्टिक्स व दळणवळण या पाच प्रमुख क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याचे प्रस्तावित आहे.
देशाच्या GDP आणि निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे १५ टक्के असून, भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे एक-तृतीयांश गुंतवणूक महाराष्ट्रात होते. देशातील डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे ६६ टक्के क्षमता महाराष्ट्रात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
२०३० पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टासाठी बेल्जियमने प्रमुख भागीदार व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच भारत-बेल्जियम गुंतवणूक प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून बेल्जियममधील संस्था आणि उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात येणार आहे.
वाढवण येथील खोल समुद्री बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्र जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित होत आहे. अँटवर्प-ब्रुज बंदर आणि महाराष्ट्रातील बंदरांदरम्यान हरित नौवहन तसेच तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






