ब्राह्मण समाजाचे आमरण उपोषण सातव्या दिवशी तात्पुरते स्थगित,भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या हस्ते ज्यूस घेत दीपक रणनवरे यांनी सोडले उपोषण
जालना (प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी) :
ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून जालना शहरातील गांधी चमन येथे सुरू केलेले आमरण उपोषण सातव्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले.
ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एमपीएससी परीक्षेसाठी मोफत क्लासेस सुरू करण्यात यावेत, ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे ब्राह्मण समाजासाठीही सक्षम कायदा करण्यात यावा, तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, यासह विविध मागण्या रणनवरे यांनी उपोषणाच्या माध्यमातून मांडल्या होत्या.
या आंदोलनाची आणि ब्राह्मण समाजाच्या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी शनिवारी जालना येथील उपोषणस्थळी भेट देऊन रणनवरे यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगत राम कुलकर्णी यांच्या हस्ते ज्यूस घेऊन दीपक रणनवरे यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले.
यावेळी ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






