‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मधून आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत **‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६ एडिशन-२’**च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन मुंबईत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ग्लोबल साउथच्या वाढत्या भूमिकेवर भाष्य केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने समावेशकता, नीतीमत्ता आणि सत्याच्या विजयाचा संदेश दिला. जग सध्या मोठ्या विखंडनाच्या परिस्थितीतून जात असताना, विविध देशांना आणि समाजांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठांची गरज आहे. राजकीय व आर्थिक संवादासोबतच संस्कृती, विचार आणि सामाजिक मूल्यांची देवाणघेवाण झाल्यास खरी जागतिक एकता साध्य होऊ शकते.
भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन संकल्पनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, प्राचीन काळात जागतिक व्यापारात भारताचा वाटा मोठा होता. भारताने जगाला केवळ वस्तूंची निर्यात केली नाही, तर उदात्त विचारांचीही देणगी दिली. बौद्ध धर्माचा प्रसार हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
BRICS आणि BRICS Plus सारखी व्यासपीठे ग्लोबल साउथच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. बहुध्रुवीयता आणि विविधता ही निसर्गाची देणगी असून, या विविधतेचा सन्मान आणि जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि फिनटेक राजधानी असून, विविध संस्कृतींना सामावून घेणारे हे शहर भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चेही महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी मुंबई हे आदर्श ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आर्थिक सहकार्यासोबतच कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील आदानप्रदानावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्यदूत जोस माउरो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेटिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन जिए, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत जी. ई. लाबाने यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






