पुण्यात डीजे व ध्वनीप्रदूषणप्रकरणी पोलिसांची कारवाई; बिबवेवाडीत पहिला गुन्हा दाखल
पुणे : दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिबवेवाडीतील श्रीकृष्ण तरुण मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परवानगीपेक्षा अधिक लाउडस्पीकरचा वापर केल्याचा आरोप असून, पोलिसांनी साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीजे, लाउडस्पीकर आणि ध्वनीप्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
मंडळाने परवानगीपेक्षा अधिक क्षमतेची साऊंड सिस्टिम वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेली साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी






