अंतिम संस्कारासाठी नेला जात होता मृतदेह; रस्त्यातील खड्ड्यामुळे रुग्णपालिकेला बसला झटका अन् सुरू झाले श्वास
ऋषिकेश:
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथून वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी आणि नातेवाईकांना दिलासा देणारी एक अत्यंत विचित्र व अजब घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या एका व्यक्तीचे रुग्णवाहिका खड्ड्यात आदळल्याच्या तीव्र धक्क्याने अचानक श्वास सुरू झाले आहेत.
काय घडली नेमकी घटना?
ऋषिकेश येथील गीता नगर (गल्ली नं. ५) मधील रहिवासी साईं राम यांना मूत्रपिंड विकाराचा (Kidney Failure) त्रास होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ऋषिकेश एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रुग्णालयाने मृत घोषित केल्यानंतर दुःखात बुडालेल्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
अंत्ययात्रेसाठी मुक्तिधाम सेवा समितीचे विशेष वाहन/रुग्णवाहिका मागवण्यात आली. मृतदेह वाहनात ठेवून श्यामपूर रेल्वे फाटक भागातून स्मशानभूमीकडे नेत असताना रस्त्यावरील एका मोठ्या आणि खोल खड्ड्यात रुग्णवाहिकेचे चाक जोराने आदळले.
खड्ड्याच्या धक्क्याने चमत्कार
रुग्णवाहिका खड्ड्यात आदळल्याने वाहनाला तीव्र झटका बसला. या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे कथित मृत व्यक्तीच्या शरीरात हालचाल झाली आणि त्यांनी डोळे उघडले. नातेवाईकांनी तात्काळ पाहणी केली असता साईं राम यांचे श्वास पुन्हा सुरू झाल्याचे लक्षात आले.
डॉक्टरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची वाट सोडून साईं राम यांना तात्काळ पुन्हा उपचारासाठी ऋषिकेश एम्स रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे ऋषिकेश परिसरात मोठा गदारोळ माजला असून, एका जिवंत व्यक्तीला थेट ‘मृत’ घोषित करणाऱ्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदानावर आणि निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





