विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; धार्मिक भावना
दुखावल्याचा आरोप, बिनशर्त माफीची मागणी
पुणे : प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या काही कथित वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीदरम्यान हिंदू परंपरा आणि श्री गणेशाबाबत केलेली विधाने आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. प्रदीप नाईक यांनी बापट यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याचे समोर आले आहे.
या नोटीसमध्ये संबंधित वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, विद्यानंद बापट यांनी ४८ तासांच्या आत बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत माफी न मागितल्यास कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बापट यांच्या मुलाखतीतील संबंधित वक्तव्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





