टाकळीभानचा अस्लम इनामदार पुन्हा आशियाचा ‘सुवर्णवीर’! अंतिम सामन्यात इराणवर ४०-३४ ने मात

टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान च इनामदार सुपुत्र आणि भारतीय कबड्डीपटू अस्लम मुस्तफा याने पुन्हा एकदा आपल्या गावाचे, श्रीरामपूर तालुक्याचे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णविजेत्या संघाचा अस्लम इनामदार हा महत्त्वपूर्ण सदस्य आहे.
अंतिम २६ सप्टेंबर रोजी झालेल्या भारताने सामन्यात बलाढ्य इराणचा ४०-३४ असा पराभव करत सुवर्णपदकावर पुन्हा नाव कोरले. पहिल्या अर्थात इराणने १८-१७ अशी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या अर्थात भारतीय खेळाडूंनी आक्रमणासोबतच बचावातही दमदार कामगिरी करत सामन्याचे पारडे फिरवले.
विशेष म्हणजे, अस्लमचे हे सलग दुसरे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी हांगझोऊ येथे झालेल्या स्पर्धेतही तो सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. हांगझोऊनंतर आयची नागोया येथेही सुवर्णपदक जिंकत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित केली. युवा पलटण ते भारतीय संघ असा अस्लमचा प्रेरणादायी प्रवास आहे. २०१८ मध्ये पुणेरी पलटणच्या युवा अकादमीत प्रवेश केल्यानंतर त्याने कठोर प्रशिक्षण घेतले. २०२१ मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणकडून पदार्पण करत त्याने चढाई आणि बचावातील अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. पुढे त्याच्यावर पुणेरी पलटणचे कर्णधारपदही सोपविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अस्लमने २०२२ मधील वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्र संघात योगदान दिले. ग्रामीण भागातील टाकळीभानच्या मातीतून भारतीय कबड्डीच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचलेल्या अस्लमच्या या कामगिरीने टाकळीभानसह श्रीरामपूर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होण्याचा मान अस्लमवर मिळाला, क्रीडा प्रेमि व नागरिकाकडून अभिनंदन होत आहे,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर








