‘समाज पर्व’मधून समाजकार्याला नवी दिशा; विविध उपक्रमांचे नियोजन
विशेष वृत्त / प्रतिनिधी
समाजातील विविध घटकांच्या गरजा ओळखून सामाजिक कार्याला केवळ प्रसंगाधारित स्वरूप न देता ते नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबविण्याची संकल्पना म्हणजे ‘समाज पर्व’ होय. शिक्षण, आरोग्य, सेवा, पर्यावरण, संस्कृती आणि स्वावलंबन या समाजजीवनातील सहा महत्त्वाच्या क्षेत्रांना स्वतंत्र ‘पर्वां’मध्ये विभागून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.
‘ज्ञान पर्व’मध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, वह्या-पुस्तक बँक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रामीण वाचनालये आणि डिजिटल साक्षरता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘आरोग्य पर्व’मध्ये मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान, महिला आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान आणि मानसिक आरोग्य समुपदेशनावर भर दिला जाणार आहे.
‘सेवा पर्व’अंतर्गत अन्नदान, अन्नछत्र, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांमध्ये विविध सेवा उपक्रम, आपत्तीच्या काळात मदतकार्य, ब्लँकेट वाटप तसेच रक्तदात्यांची साखळी उभारण्याचे नियोजन आहे.
‘निसर्ग पर्व’मध्ये ‘प्रत्येक वाढदिवसाला एक झाड’ या संकल्पनेतून वृक्षारोपण व संवर्धन, नदी, गाव आणि मंदिर परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्त अभियान, कचरा व्यवस्थापन आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
‘संस्कृती पर्व’च्या माध्यमातून लोककला, लोकसंगीत आणि पारंपरिक खेळांचे जतन, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांच्या अनुभवांचे कथन तसेच ‘युवा संवाद’च्या माध्यमातून प्रेरणादायी व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. विविध समाजघटकांचे सण एकत्र साजरे करून सामाजिक एकतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
‘स्वावलंबन पर्व’मध्ये महिलांसाठी बचत गट व लघुउद्योग प्रशिक्षण, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या सहा पर्वांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवून ‘सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी’ यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविणे, हा ‘समाज पर्व’चा उद्देश आहे. या उपक्रमांमुळे गरजू घटकांना आधार मिळण्यासोबतच समाजकार्याला अधिक व्यापक आणि संघटित दिशा मिळेल, असा विश्वास ‘समाज पर्व’चे संस्थापक नितीन शुक्ल यांनी व्यक्त केला.
पत्रकार उमेश कुलकर्णी








