शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद… पिंपरी-चिंचवडचा विश्वविक्रम!

४ हजार ११२ ढोल-ताशांच्या वादनातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना
पिंपरी | दि. ४ ऑक्टोबर २०२६ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादातून ऐतिहासिक मानवंदना देत पिंपरी-चिंचवडमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी हा भव्य सोहळा पार पडला.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ढोल-ताशा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली या तीन ठिकाणी एकाच वेळी ढोल-ताशांचे वादन करण्यात आले.
यापूर्वी २ हजार ६५० ढोल-ताशांच्या वादनाचा विक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा विक्रम मोडीत काढत पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४ हजार ११२ ढोल-ताशांच्या वादनातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला.
विश्वविक्रमासाठी वादकांना तीन संधी देण्यात आल्या. सलग पाच मिनिटे शिस्तबद्ध, एकसंध आणि समन्वयाने वादन करण्याचे आव्हान सहभागी पथकांसमोर होते. हजारो वादकांनी ठेक्यातील सातत्य आणि शिस्त कायम ठेवत हा संकल्प पूर्ण केला. ढोल-ताशांच्या निनादातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमात ‘शिवशंभो गर्जना’, मर्दानी खेळ आणि शाहिरी सादरीकरण यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १११ शंखांचा सामूहिक शंखनाद हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबतच निर्माणाधीन १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजालाही मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतमातेची आकर्षक रंगावलीही साकारण्यात आली.
‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी ‘गोमाता सन्मान अभियान’ याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले.
शिस्त, समन्वय आणि शिव-शंभूप्रेमाचा विजय
आमदार महेश लांडगे म्हणाले, “ही मानवंदना महाराष्ट्राच्या शौर्य आणि एकजुटीचा आविष्कार आहे. वादकांची शिस्त, पथकांचा समन्वय आणि शिव-शंभूप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे विश्वविक्रमाचा संकल्प साकार झाला. या यशाचे खरे मानकरी सर्व वादक, पथकप्रमुख, स्वयंसेवक आणि नागरिक आहेत. सांस्कृतिक वारसा जपत व्यसनमुक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे.”
दरम्यान, पुढील वर्षी रविवार, दि. १९ सप्टेंबर २०२७ रोजी याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे








