गर्डर बसविण्यासाठी ठाणे-बेलापूर रोड चार रात्री बंद
४, ९, १० आणि ११ ऑक्टोबरला रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
नवी मुंबई | विशेष प्रतिनिधी :
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गावरील गर्डर बसविण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
गर्डर बसविण्याच्या कामासाठी ४, ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ या चार रात्री रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-बेलापूर रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांची गैरसोय कमी करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांसह विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. संबंधित कालावधीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
उन्नत मार्गाचे काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





