MPSC आंदोलनावर पोलिसांचा कारवाईचा इशारा; ५१ विद्यार्थी, २९ शिकवणी व अभ्यासिका चालकांना नोटिसा
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनासाठी आवश्यक पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी ५१ विद्यार्थी तसेच २९ खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पुण्यातील एस. एम. जोशी पूल, लोकमान्य टिळक चौक आणि शास्त्री रस्ता परिसरात विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. परीक्षा पद्धतीतील बदल, आयोगाचा कारभार, रिक्त पदांची घोषणा यासह विविध मागण्यांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नांकडे शासन आणि आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधितांना आंदोलन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरू राहिल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होणार की विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात तोडगा निघणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





