‘सकाळ करंडका’ची उत्साहात नांदी!
पुणे विभागीय अंतिम फेरीला सुरुवात; पहिल्याच दिवशी पाच एकांकिकांचे दमदार सादरीकरण
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘सकाळ करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विविध महाविद्यालयांच्या संघांनी पाच एकांकिकांचे सादरीकरण करत आपल्या अभिनयकौशल्याची आणि रंगमंचीय प्रतिभेची झलक दाखवली.
‘अरे आवाज कुणाचा, अरे करंडक कुणाचा!’ अशा उत्स्फूर्त घोषणांनी नाट्यगृहाचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थी कलाकारांनी प्रभावी अभिनय, दमदार संवादफेक, कल्पक दिग्दर्शन, नेपथ्य आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांची दाद मिळवली. आपल्या महाविद्यालयाच्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी तसेच नाट्यरसिकांची मोठी उपस्थिती होती.
राज्यातील सहा विभागांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विभागीय अंतिम फेरीला सोमवारपासून सुरुवात झाली असून, विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर आधारित एकांकिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांमधील अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि रंगभूमीविषयक कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ करंडक’ स्पर्धेकडे महाविद्यालयीन वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. पुढील दिवसांतही विविध महाविद्यालयांच्या दर्जेदार एकांकिका सादर होणार असून, अंतिम विजेतेपदाचा करंडक कोण पटकावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





