मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक; ६ ते ७ जण जखमी


मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक; ६ ते ७ जण जखमी

मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंकवर मंगळवारी पहाटे अवघ्या दोन तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात झाल्याने खळबळ उडाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रथम केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. त्यानंतर बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या दुसऱ्या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ६ ते ७ प्रवासी जखमी झाले आहेत.
पहिला अपघात मध्यरात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. अतिवेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक समीर शेख जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टेम्पो पलटी झाल्याने त्यातील केळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासह रस्त्यावर विखुरलेल्या केळी हटविण्याचे काम हाती घेतले.
दरम्यान, पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास लोणावळा हद्दीत याच मार्गावर बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील ६ ते ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतर संबंधित लेनवरील वाहतूक काही काळ रोखण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. बस-ट्रकची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अवघ्या काही तासांच्या अंतराने एकाच मार्गावर दोन अपघात झाल्याने मिसिंग लिंकवरील वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातांच्या कारणांचा आणि जबाबदारीचा तपास महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!