पिंपरीमध्ये ५० वर्षीय व्यक्तीची हत्या; तिघांना अटक.
पिंपरी, : दि. ६ ऑक्टोबर २०२६ : नेहरूनगर परिसरात फुटपाथवर झोपलेल्या ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी फरशीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
प्रभाकर कुंडलिक सरकटे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यानच्या फुटपाथवर ही घटना घडली.
फिर्यादी गणेश प्रभाकर सरकटे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून प्रभाकर सरकटे यांच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी फरशीने मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान अथवा घटनेनंतर मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात रोहित ऊर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे, अर्णव ऊर्फ अरव लोकेश ऊर्फ आरब्या, प्रणित प्रशांत निकाळजे आणि सचिन राम साबळे यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत.
यापैकी रोहित धोत्रे, प्रणित निकाळजे आणि सचिन साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अर्णव ऊर्फ अरव याचा शोध सुरू असून, त्याबाबत पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे





