साहेबराव घाडगे पाटील यांना सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्कार

टाकळीभान : नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सह्याद्री रत्न पुरस्कार’ सोहळ्यात त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांना मरणोत्तर ‘सह्याद्री शिक्षणरत्न’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून, परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी जीवनात यशस्वी व्हावे, या ध्येयाने त्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याचा पाया रचला. त्यांनी पाहिलेले शैक्षणिक प्रगतीचे स्वप्न आज त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून पुढे जात आहे.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. ही भूमिका लक्षात घेऊन स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे ठरले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजही विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि प्रगतीची प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर राष्ट्रीय स्तरावरील ‘सह्याद्री शिक्षणरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. घाडगे पाटील परिवाराच्या वतीने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा स्नेहलताई चव्हाण घाडगे पाटील आणि चेतन चव्हाण पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, कार्यकारी संपादिका पूनमताई नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार म्हणजे स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि ग्रामीण भागातील शिक्षणविकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, घोगरगावचे प्राचार्य संतोष जावळे सर यांनी घाडगे पाटील परिवाराचे आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य संतोष जावळे सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. हा पुरस्कार त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासाठी अभिमानाची बाब असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







