पिंपरी-चिंचवडमध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचा विमा द्या; रावसाहेब थोरात यांची मागणी
महापौरांकडे निवेदन; अंत्यविधीचा संपूर्ण खर्च महापालिकेने उचलण्याचीही मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कर भरणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी महानगरपालिकेने पाच लाख रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रवक्ते (पिंपरी-चिंचवड भोसरी शहर) रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रविभाऊ लांडगे यांना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात विविध कारणांनी नागरिकांचा मृत्यू होत असतो. अशा वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यविधीचा खर्च तसेच इतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर या परिस्थितीत मोठा आर्थिक भार पडतो.
महानगरपालिका हद्दीत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा विमा मिळावा. तसेच मृत व्यक्तीचे पती किंवा पत्नी, आई-वडील, मुलगा-मुलगी अथवा भाऊ-बहीण यांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी होणारा संपूर्ण खर्च महानगरपालिकेने उचलावा, अशी मागणीही थोरात यांनी केली आहे.
यासाठी महानगरपालिकेने आवश्यक नियमावली तयार करून संबंधित तरतुदींची अंमलबजावणी करावी. नागरिकांना संकटाच्या काळात आर्थिक मदत मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या मागणीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती थोरात यांनी केली आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ




