ममता बॅनर्जींवर हल्ल्याचा प्रयत्न? कालीघाटमधील घटनेने खळबळ; महिलेची पोलिसांकडून चौकशी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सायंकाळी कोलकात्यातील कालीघाट परिसरात दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची साडी ओढली. संबंधित महिलेच्या जवळ चाकू असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी कालीघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, घटनेशी संबंधित व्हिडिओंची तपासणी केली जात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न आणि चाकूच्या संदर्भातील दाव्यांबाबत तपासातून अधिकृत निष्कर्ष समोर येणे बाकी आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







