कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी CBG प्रकल्प उभारणार
मुंबई : राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासाठी कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मिती प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला.
CBG प्रकल्पांसाठी टास्क फोर्स स्थापन करून राज्याच्या धोरणानुसार प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिका क्षेत्रांसह पुण्यातील हिंजवडी आणि चाकण परिसरात प्रकल्प उभारण्याच्या शक्यतेचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
प्रकल्पांचे नियोजन करताना कचऱ्याचे प्रमाण, उपलब्ध जमीन, तंत्रज्ञान आणि गॅस पाइपलाइनचे अंतर विचारात घेण्यावर भर देण्यात आला. तसेच जवळच्या शहरांचा समावेश करून क्लस्टर पद्धतीने प्रकल्प उभारण्याचाही पर्याय तपासण्यात येणार आहे.
या प्रकल्पांमुळे कचरा व्यवस्थापनाचा खर्च कमी होण्यास आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







