दुष्काळात मजुरांना रोजगाराची संधी; एका फोनवर नोंदवा कामाची मागणी!


दुष्काळात मजुरांना रोजगाराची संधी; एका फोनवर नोंदवा कामाची मागणी!

व्हीबी-जी राम जी अभियानांतर्गत जालना जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू; १५ दिवसांत काम देणे बंधनकारक

भोकरदन : प्रतिनिधी महेंद्र बेराड

जालना, दि. १६ ऑक्टोबर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने रोजगार मागणी हेल्पलाइन सुरू केली आहे. विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी (VB-G RAM G) अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांना रोजगाराची मागणी नोंदवण्यासाठी ग्रामपंचायत किंवा तालुका कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ८२७५५ २०२४१ या हेल्पलाइन क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन मजुरांना घरबसल्या रोजगाराची मागणी नोंदवता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित शाखेमार्फत ही हेल्पलाइन चालविण्यात येत असून, सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सर्व दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. मजुरांनी दिलेल्या मिस्ड कॉलनंतर हेल्पलाइनवरून त्यांना परत फोन केला जाईल आणि रोजगाराच्या मागणीची नोंद घेण्यात येईल. ग्रामीण भागातील मजुरांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रोजगाराची मागणी, नोंदणी आणि तक्रारींचीही सुविधा

या हेल्पलाइनच्या माध्यमातून केवळ रोजगाराची मागणीच नव्हे, तर जॉब कार्ड नसलेल्या कुटुंबांनाही नोंदणीसाठी मागणी करता येणार आहे. रोजगाराची मागणी करूनही काम न मिळणे, मजुरी मिळण्यास विलंब होणे किंवा कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे, अशा समस्यांबाबतही तक्रार नोंदवता येणार आहे.

फोनवर माहिती देताना मजुरांनी स्वतःचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, तालुका, ग्रामपंचायत आणि गावाचे नाव सांगणे आवश्यक आहे. जॉब कार्ड असल्यास त्याचा क्रमांक, रोजगाराची आवश्यकता असलेल्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या, किती दिवस काम हवे आहे आणि कोणत्या तारखेपासून काम सुरू करायचे आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे.

मागणीची नोंद झाल्यानंतर संबंधित मजुराला स्वतंत्र संदर्भ क्रमांक दिला जाणार आहे. पुढील पाठपुरावा करण्यासाठी हा क्रमांक महत्त्वाचा असल्याने तो जपून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

१५ दिवसांत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्त्याची तरतूद

हेल्पलाइनवर नोंदविण्यात आलेली रोजगाराची मागणी त्याच दिवशी संबंधित ग्राम रोजगार सेवक आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडून मजुराला मागणीची तारीख नमूद असलेली अधिकृत पावती दिली जाईल. त्यामुळे रोजगाराची मागणी केल्याची नोंद मजुराकडे राहणार आहे.

योजनेच्या नियमानुसार, रोजगाराची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत काम उपलब्ध न झाल्यास संबंधित मजूर नियमानुसार बेरोजगारी भत्त्यास पात्र ठरू शकतो. प्रत्येक प्रकरणात मजुरांना वेळेत रोजगार मिळतो की नाही, यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला १२५ दिवस रोजगाराची हमी

या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. शक्यतो मजुरांच्या गावापासून पाच किलोमीटरच्या आत काम उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. कामाची मजुरी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तसेच राज्याच्या रोजगार हमी योजनेनुसार पावसाळ्यातही मागणी केल्यास काम उपलब्ध करून दिले जाते.

जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन रोजगारनिर्मितीसोबतच जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. तलावांतील गाळ काढणे, नाल्यांचे पुनरुज्जीवन, विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण यांसारखी कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. या कामांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच पावसाचे पाणी साठवणे आणि भूजलपातळी वाढविण्यासही मदत होणार आहे.

आधार क्रमांक, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नका

हेल्पलाइनच्या माध्यमातून रोजगाराची मागणी नोंदवताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रोजगाराची मागणी नोंदवण्यासाठी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा ओटीपी विचारला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती कोणालाही देऊ नये.

जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामीण मजुरांनी या सुविधेचा लाभ घेऊन रोजगाराची मागणी नोंदवावी. तसेच सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आणि लोकप्रतिनिधींनी हेल्पलाइनची माहिती गावागावांत पोहोचवून अधिकाधिक मजुरांपर्यंत ही सुविधा पोहोचवावी, असे आवाहन विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

—

चौकट : रोजगार मागणी हेल्पलाइन

– हेल्पलाइन क्रमांक : ८२७५५ २०२४१
– सेवेची वेळ : सकाळी ८ ते रात्री ८
– सेवा सुरू : सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सर्व दिवस
– कामाची हमी : मागणी केल्यानंतर १५ दिवसांत रोजगार
– वार्षिक रोजगार : प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवस
– मजुरी : थेट बँक खात्यात जमा
– नोंदणी प्रक्रिया : मिस्ड कॉलनंतर हेल्पलाइनवरून परत फोन
– महत्त्वाची सूचना : मिळालेला संदर्भ क्रमांक जपून ठेवा. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका.


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!