सहकारी सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापन, पुनर्विकास व क्लस्टर विकासावर भव्य प्रदर्शन


पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी भव्य प्रदर्शन

सहकारी सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापन, पुनर्विकास व क्लस्टर विकासावर भव्य प्रदर्शन


चिखली येथील टाऊन हॉलमध्ये ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला आयोजन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध विषयांवर व्याख्याने

पिंपरी-चिंचवड : सहकारी गृहनिर्माण संस्थांसमोरील विविध प्रश्न, कचरा व्यवस्थापन, पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास आणि क्लस्टर विकास या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांच्या वतीने भव्य प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी चिखली येथील टाऊन हॉलमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि व्यवस्थापन समित्यांना विविध कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय बाबींची माहिती मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सुहास पटवर्धन करणार पुनर्विकासावर मार्गदर्शन
या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास विषयावरील मार्गदर्शन. पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन हे पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. पुनर्विकासाची प्रक्रिया, संस्थांनी घ्यावयाची खबरदारी आणि संबंधित महत्त्वाच्या बाबींविषयी यावेळी माहिती मिळणार आहे.
सोसायट्यांच्या विविध प्रश्नांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या प्रदर्शनात सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स, थकीत देखभाल शुल्काची वसुली, लिफ्ट व अग्निसुरक्षा व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प (OWC) व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय सोसायटी पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, डिजिटल सोसायटीसाठी उपलब्ध पर्याय, अपार्टमेंटचे सहकारी गृहनिर्माण संस्थेत रूपांतर, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोसायटीतील सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता व उपयुक्तता आणि सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग अशा विषयांचाही समावेश आहे.
शासकीय यंत्रणा आणि कंपन्यांचे प्रदर्शन
या प्रदर्शनात विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ दोन्ही दिवस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय यंत्रणा आणि कॉर्पोरेट कंपन्यांची उत्पादने, सेवा व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी विविध दालने उभारण्यात येणार आहेत.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी तसेच संस्थांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
सहभागाचे आवाहन
या प्रदर्शनाचा लाभ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सभासदांनी घ्यावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रदर्शन संयोजक आशिष सातकर (९८८१७४७४०६), विजय महाजन (७३९१८८१७९२) आणि भीम बलकवडे (९६८९८९८३६०) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी अभिजीत कुलकर्णी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!