शासकीय दवाखान्यासमोरील रस्त्यावर एक फूट खोल खड्डा; गर्भवती महिलेची गाडी घसरली!

तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची गौरव चितळे यांची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील शासकीय दवाखान्यासमोरील नेवासा-श्रीरामपूर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर सुमारे एक फूट खोल खड्डा पडल्याने रुग्ण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः गर्भवती महिलांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा खड्डा तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठानचे गौरव राजेंद्र चितळे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, श्रीरामपूर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासकीय दवाखान्यात परिसरातील अनेक गर्भवती महिला दर महिन्याला नियमित तपासणीसाठी येत असतात. तसेच प्रसूती आणि इतर आरोग्यविषयक उपचारांसाठीही नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. अशा महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यावर सुमारे एक फूट खोल खड्डा पडलेला असणे ही गंभीर बाब आहे.
या खड्ड्यामुळे यापूर्वीही अनेकदा वाहनचालकांचे अपघात होता होता टळले आहेत. दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी दवाखान्यात येत असताना एका गर्भवती महिलेची गाडी या खड्ड्यामुळे घसरून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि या समस्येस जबाबदार असलेल्या संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी गौरव चितळे यांनी केली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर








