पुस्तकांची मैत्री हीच समृद्ध समाजनिर्मितीची गुरुकिल्ली!
पुस्तकांची मैत्री हीच समृद्ध समाजनिर्मितीची गुरुकिल्ली!
मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; ७० हजार नागरिकांची आधीच नोंदणी
मुंबई : पुस्तकांशी मैत्री केल्याने विचारांना दिशा मिळते, व्यक्तिमत्त्व घडते आणि समाज अधिक प्रगल्भ बनतो. त्यामुळे वाचनसंस्कृती अधिक समृद्ध आणि जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई येथे आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वीच तब्बल ७० हजार नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती देत त्यांनी मुंबईकरांचा, विशेषतः तरुण पिढीचा वाचनाकडे वाढता कल आनंददायी असल्याचे सांगितले.
पुस्तके म्हणजे विचारांना दिशा देणारे मित्र!
पुस्तके ही केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून ती विचारांना पंख देतात, संवेदना जागृत करतात आणि माणसाच्या जाणिवांचा विस्तार करतात. पुस्तकांच्या माध्यमातूनच प्रगल्भ आणि समृद्ध समाजाची निर्मिती होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी करुणा, प्रेम, नैतिकता आणि मानवी संवेदना ही मूल्ये पुस्तकांच्या वाचनातूनच अधिक विकसित होतात. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी पुस्तकांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईने जपला मराठी भाषा आणि संस्कृतीचा वारसा
मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून कला, साहित्य आणि संस्कृतीचेही महत्त्वाचे केंद्र आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा मुंबईने जपला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता समृद्ध करण्यात मुंबईचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई पुस्तक महोत्सव दरवर्षी आयोजित होणार
नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा मुंबई पुस्तक महोत्सव हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून साहित्यिक, विचारवंत, संपादक आणि कवी यांच्या विचारांची देवाणघेवाण होणार आहे. नागरिकांनी आपल्या आवडीच्या विषयांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन ज्ञानाचा विस्तार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तकांचा उत्सव नसून संवेदना, मानवता आणि उज्ज्वल भविष्याचा उत्सव आहे. मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार रवींद्र चव्हाण, महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






