शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; मंदार किवळे गंभीर जखमी
सहा हल्लेखोरांचे भरदिवसा थरारनाट्य; दोन्ही हातांवर सपासप वार, घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ बाहेर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास सहा हल्लेखोर दोन दुचाकींवरून न्यायालय परिसरात आले. त्यांनी मंदार किवळे याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या त्याला लागल्या नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचे हात गंभीर जखमी झाले असून एका हाताचा मनगटापासून गंभीर भाग छाटल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता घटनास्थळावरून दोन पिस्तुले, काडतुसे आणि अन्य वस्तू जप्त केल्याचे वृत्त आहे.
मंदार किवळे याच्यावर यापूर्वी खून प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून हा हल्ला झाला आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
न्याय मिळवण्यासाठी नागरिक ज्या न्यायालयात येतात, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर भरदिवसा शस्त्रांसह हल्ला होण्याच्या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी नागरिक आणि वकिलांकडून होत आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ







