औषध सुरक्षा कायद्याच्या मागणीसाठी १ डिसेंबरला राज्यभर आंदोलन!


औषध सुरक्षा कायद्याच्या मागणीसाठी १ डिसेंबरला राज्यभर आंदोलन!

रुग्ण हक्क परिषदेचा राज्यव्यापी निर्धार मेळावा; औषधांच्या किमती पाच हजार रुपयांपर्यंत मर्यादित करण्याची मागणी
पुणे : महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे सर्वसामान्य रुग्णांचे आर्थिक कंबरडे मोडत असून, औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात ‘औषध सुरक्षा कायदा’ लागू करावा. तसेच औषधांच्या किमती पाच हजार रुपयांपर्यंत मर्यादित ठेवाव्यात आणि ‘रुग्ण हक्क संरक्षण कायदा’ संमत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या राज्यव्यापी निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) राज्यव्यापी भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आंदोलनाची भूमिका आणि विविध मागण्यांची माहिती दिली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक शिंदे, पुणे शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे, सोशल मीडिया प्रमुख शैलेश खुंटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये विभागीय प्रदेशाध्यक्षपदी कोकण विभागासाठी धनंजय म्हात्रे, विदर्भ विभागासाठी प्रा. डॉ. संजय शेणमारे, पश्चिम महाराष्ट्रासाठी विजय कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्षपदी पालघरसाठी वैभव खेडेकर, रायगडसाठी रूपा सुखदरे, पुण्यासाठी सुरेश फाले, मुंबईसाठी मनोज मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे शहराध्यक्षपदी अपर्णा साठ्ये आणि प्रदेश संघटकपदी शैलेश खुंटे यांची निवड करण्यात आली.
औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी
उमेश चव्हाण म्हणाले की, सध्या औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना एक ते दोन लाख रुपयांचे इंजेक्शन खरेदी करावे लागते. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दरमहा सुमारे ४० हजार रुपयांची औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण बनले आहे.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती केल्या जातात. सरकारकडून औषध खरेदीसाठी निविदाही काढल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. दुसरीकडे औषधनिर्मिती आणि भांडवलदार कंपन्या कोट्यवधी, अब्जावधी रुपयांचा नफा कमावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अन्नसुरक्षा कायद्याच्या धर्तीवर औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारा स्वतंत्र ‘औषध सुरक्षा कायदा’ तयार करण्यात यावा. कितीही महागडी औषधे असली तरी त्यासाठी शासनाने अनुदानाची तरतूद करावी, स्वतंत्र बजेट उपलब्ध करून द्यावे किंवा औषध खरेदीसाठीचे अर्थसंकल्पीय नियोजन वाढवावे. कोणत्याही औषधाची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक होऊ नये, तसेच या मर्यादेचे उल्लंघन करून औषधांची विक्री करणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी त्यांनी केली.
रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करण्याचा निर्धार
सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार कायद्याच्या माध्यमातून मोफत उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘रुग्ण हक्क संरक्षण कायदा’ पारित करण्याची मागणीही मेळाव्यात करण्यात आली. या दोन्ही कायद्यांच्या मंजुरीसाठी १ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतर राज्य सरकार या मागण्यांबाबत काय भूमिका घेते, यानुसार पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे उमेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले, तर अशोक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!