नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा
मूलभूत हक्क आणि कर्तव्यांविषयी अॅड. डॉ. दीपाली जयदीप जयवंत यांचे मार्गदर्शन
नेरूळ : भारतीय संविधान
दिनानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेसकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अॅडव्होकेट डॉ. दीपाली जयदीप जयवंत प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने आपले इच्छापत्र (विल) आणि लिव्हिंग विल तयार करून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेसकॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधान ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली अनमोल देणगी असल्याचे सांगितले. संविधानामुळे देशाला लोकशाहीची भक्कम पायाभरणी मिळाली असून, संविधानातील मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे यांनी प्रास्ताविकातून संविधानाच्या ७६ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. संविधानाने दिलेली समता, बंधुता, न्याय आणि सामाजिक न्याय ही मूल्ये समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचली आहेत का आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्यांना मिळतो आहे का, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला फेसकॉमचे उपाध्यक्ष श्री. अशोक तेरकर, सचिव श्री. चंद्रकांत महामुनी तसेच फेसकॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला फेसकॉमचे विविध पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. अजय माढेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचा वाढदिवस सामूहिकरीत्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







