परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मराठवाड्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद!
थेट १५ लाखांचे कर्ज नाही, बँकेच्या कर्जावरील व्याजाचा मिळणार परतावा; दिव्यांगांसाठी ३ टक्के आरक्षण – कार्यकारी संचालक प्रताप भोसले यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर | योगेश धर्माधिकारी
ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर येथे मार्गदर्शन व अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या शिबिरात महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रताप भोसले यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच कर्ज वितरण प्रक्रियेबाबत समाजात असलेले गैरसमज दूर केले.
थेट १५ लाखांचे कर्ज मिळत नाही!
महामंडळाकडून थेट १५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, असा गैरसमज समाजात आहे. मात्र, महामंडळ थेट कर्ज वितरण करत नसून लाभार्थ्यांनी बँकेकडून घेतलेल्या पात्र कर्जावरील व्याजाचा परतावा नियमानुसार दिला जातो, असे प्रताप भोसले यांनी स्पष्ट केले. घटक कर्ज योजना आणि वैयक्तिक कर्ज योजना अशा दोन प्रमुख योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
दिव्यांगांसाठी ३ टक्के आरक्षण
महामंडळाच्या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षणाची तरतूद असल्याची महत्त्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. दिव्यांग बांधवांनी माहितीअभावी योजनांपासून वंचित राहू नये, तसेच अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेऊन पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.
मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या शिबिराला उदय कोतापल्ले, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील, दीपक रणवरे, दीपक मोरेश्वर मार्डीकर, योगेश धर्माधिकारी, धनंजय नारळे, विजय शेकदार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रताप बसरे यांनी महामंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच तुषार ठोंबरे हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे नमूद करण्यात आले. शिबिरात इच्छुक लाभार्थ्यांना अर्जांचे वाटप, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी महामंडळाच्या योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील जास्तीत जास्त पात्र समाजबांधवांनी योजनांची माहिती घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले. या शिबिरामुळे मराठवाड्यातील ब्राह्मण समाजात आर्थिक विकासाच्या योजनांबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.
योगेश धर्माधिकारी लोक 1 न्यूज पैठण प्रतिनिधी






