पारध शाहूराजे (प्रतिनिधी) : बारी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकासाला नवी दिशा देण्यासाठी रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भारज बुद्रुक (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथील बारी समाज मंगल कार्यालयात भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील गावांसह जालना, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, सिल्लोड आणि बुलढाणा येथील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेंद्र बेराड यांनी केले आहे.
या मेळाव्यात समाजाची एकजूट, तरुणांचे शिक्षण, रोजगार, उद्योग-व्यवसाय आणि राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर विचारमंथन होणार आहे. तसेच अंजनगाव सुर्जी येथे संत श्री रुपलाल महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणे आणि बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत चर्चा होणार आहे.
जुन्या कालबाह्य रूढी-परंपरांना फाटा देऊन विज्ञाननिष्ठ विचार, शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही समाजाने संघटित भूमिका घेऊन राजकीय प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महेंद्र बेराड यांनी केले आहे.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील सर्व घटकांनी या परिवर्तन मेळाव्यात सहभागी होऊन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी महेंद्र बेराड






