कर्तव्य, धाडस आणि क्रीडा योगदानाचा गौरव; पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मान


कर्तव्य, धाडस आणि क्रीडा योगदानाचा गौरव; पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मान

पुणे :
पुणे शहर गुन्हे शाखेचे (युनिट ६) पोलीस निरीक्षक वाहिद अकबर पठाण यांना सन २०२५ चे मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान करण्यात आले असून, त्यांच्या कर्तव्यदक्ष सेवा, धाडसी कारवाया, गुन्हे तपासातील उल्लेखनीय कामगिरी आणि क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
१९ नोव्हेंबर २००१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केलेल्या वाहिद पठाण यांनी गेल्या २४ वर्षांच्या सेवाकाळात अनेक गुंतागुंतीच्या आणि धाडसी कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. गुन्हे तपासातील अचूकता, जलद निर्णयक्षमता आणि कठोर अंमलबजावणीमुळे त्यांनी पुणे पोलिस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कारवायांमध्ये कोल्हापूर येथे एम.डी. ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून २ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करणे, मध्यप्रदेशातील उमरी येथे बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करून ३१ देशी पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त करणे, तसेच लोणी काळभोर येथील खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या एका तासात अटक करणे या धाडसी कामगिरींचा समावेश आहे.
सन २०२४-२५ या कालावधीत घरफोडी, चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील ३२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यातही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
पोलीस सेवेसोबतच वाहिद पठाण यांनी क्रीडा क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. अत्यंत खडतर समजली जाणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा जिंकत त्यांनी जिद्द, शिस्त आणि शारीरिक क्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील ८७.७ किमीची ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ सलग दोनदा पूर्ण करून त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची प्रचीती दिली आहे.
वाहिद पठाण यांच्या गेल्या अनेक वर्षांतील उत्कृष्ट सेवाकाळ, स्वच्छ प्रतिमा आणि उल्लेखनीय योगदानामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पुणे शहर पोलिस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, कर्तव्य, धाडस आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!