परळीत महिलांचा एल्गार: “लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे!” — सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई देशपांडे यांची आक्रमक मागणी
परळी: नसरापूर येथे चिमुरड्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता परळीतही तीव्र स्वरूपात उमटत आहेत. परळीतील छत्रपती संभाजीनगर चौकात संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“सरकारकडून आम्हाला केवळ योजना नकोत, तर मुलींसाठी सुरक्षित समाज हवा. लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण आणि सुरक्षित लेक पाहिजे,” अशा संतप्त शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई देशपांडे यांनी शासनाला थेट सवाल केला.
महिलांसाठी विविध शासकीय योजना जाहीर होत असल्या तरी प्रत्यक्षात मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्याचे चित्राताई देशपांडे यांनी स्पष्ट केले. नसरापूरमधील घटना ही केवळ एका कुटुंबावरचा आघात नसून संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारी आहे. आर्थिक मदतीपेक्षा सुरक्षिततेची हमी महत्त्वाची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
परळीतील छत्रपती संभाजीनगर चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला. “नराधमाला फाशी झालीच पाहिजे”, “मुलींना सुरक्षा द्या”, “बेटी बचावच्या घोषणा नकोत, प्रत्यक्ष संरक्षण द्या” अशा आक्रमक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संतप्त महिलांसह पुरुषांनीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
नराधमांना फाशीचीच शिक्षा द्या
बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी करत, अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी जोरदारपणे केली. “कायद्याचा धाक निर्माण झाला तरच अशा विकृत प्रवृत्तीला आळा बसेल,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
मुलींसाठी निर्भय वातावरणाची मागणी
शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि प्रवासादरम्यान मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. केवळ घोषणाबाजी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असा महिलांचा स्पष्ट संदेश होता.
या घटनेनंतर परळीतील महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून, चित्राताई देशपांडे यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे. “मुलींच्या सुरक्षेची हमी द्या, अन्यथा जनआंदोलन आणखी तीव्र होईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
नसरापूरच्या घटनेने राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक तीव्र झाला असून, प्रशासनाने यावर तातडीने कठोर आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी अधिक जोर धरत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429










