नसरपूर अत्याचार प्रकरणाविरोधात वकिलांचा एल्गार; आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा भोर बार असोसिएशनचा ठाम निर्णय
भोर (पुणे):नसरपूर परिसरात घडलेल्या संतापजनक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता न्यायालयीन स्तरावर उमटू लागले आहेत. या घटनेतील नराधम आरोपीला कायदेशीर संरक्षण मिळू नये आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या भूमिकेतून भोर येथील वकिलांनी एकत्र येत आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
वकिलांचा सामूहिक निषेध:
भोर बार असोसिएशनच्या वतीने आज न्यायालयाच्या आवारात एकत्र येत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. “मानवतेला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींचे समर्थन आम्ही करणार नाही,” अशी भूमिका यावेळी उपस्थित वकिलांनी मांडली. या निर्णयामुळे आरोपीला आता स्थानिक स्तरावर कोणताही वकील मिळणे कठीण झाले आहे.
यावेळी बोलताना वकिलांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वकील संघटना पीडितेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. केवळ निषेध न नोंदवता, कायदेशीर प्रक्रियेत आरोपीला कोणतीही सवलत मिळू नये, यासाठी हा ‘एल्गार’ पुकारण्यात आला आहे.
नसरपूर अत्याचार प्रकरण समोर आल्यापासून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे. वकिलांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. तपास यंत्रणांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या निर्णयामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल आणि अशा प्रकरणांमध्ये सामाजिक बहिष्कार किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429









